भूमापन विभाग

.

जमाबंदीचे अभिलेख

टिपण बुके :

टिपण बुक म्हणजे संबंधित जमिनीचा एक प्रकारे अपरिमाणात काढलेला नकाशाच असतो. प्रथम जेंव्हा शेतजमिनीची मोजणी शंकुसाखळीने करण्यात आली, तेंव्हा संबंधित जमिनीचे नकाशे तयार करणेत आले. व त्याला सर्व्हे नंबर देण्यात आले. प्रत्येक स.नं. चे नकाशे व क्षेत्र तयार करुन ठेवण्यात आले. त्यालाच भूमापनाचे मूळ अभिलेख किंवा टिपण असे म्हणतात. टिपण हे मोडी लिपीत आहे. तसेच मराठवाडयात हे काही भागात उर्दूमध्ये आहे कारण त्या ठिकाणी निजामशाही होती. टिपणामध्ये सर्व्हे नंबरची बाहय बाजू भरीव रेषेमध्ये व त्यावरील लंब तुटक रेषांनी दर्शविलेले असतात. त्यावर मोजणी केलेल्या साखळीची मापे लिहीलेली असतात. लंबामुळे तयार झालेल्या भागांना वसला (त्रिकोण/ समलंब चौकन)म्हणतात व त्यांना लाल शाईने क्रमांक दिलेले असतात . या टिपणामध्ये संबंधित सर्व्हेनंबरचे लगत भूमापन क्रमांक व जागेवरील स्थिती (गावठाण रस्ते,पाऊल रस्ते, बैलगाडी रस्ता , ओढा, ओघळी , विहीर, झाडे इ.) बाबी नमुद केलेल्या असतात.

या सर्वबाबींमुळे जमिनीच्या भूमापन क्रमांकाचे क्षेत्रफळ अचुक काढता येते. त्यामुळे सध्या केलेल्या मोजणीकामाची तपासणी/खात्री भूमापक टिपणा आधारे करतो.

धारण केलेल्या प्रत्येक जमिनीचे (सर्व्हे नंबरचे) त्या जमिनीच्या आकारमानाप्रमाणे परिमाणात न काढलेली, आधार रेषा आणि लंब यांचे शंकुसाखळी नुसार रुपये/ आणे या परिमाणात निश्चित मोजमापे बांधमापे, वसलाक्रमांक, हद्दीच्या खुणा व लगतचे सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात अशा पध्दतीची जमिनीच्या आकारमानाप्रमाणे परिमाणात न तयार केलेल्या अभिलेख म्हणजे टिपण होय.

  • अ) कच्चे टिपण : प्रत्येक भूमापन क्रमांकाचे धारण केलेल्या वहिवाटी नुसार कच्चेटिपण (परिमाणात नसलेले रेखाचित्र) तयार करण्यात येते.त्यात वहिवाटीच्या हद्दीच्या निशाण्या घेऊन शंकू साखळीचे आधारे साखळी व आणे याप्रमाणे मोजमापे दर्शविली जातात व प्रत्येक भूमापन क्रमांकास मोजणी केलेल्या क्रमानुसार चालता नंबर देण्यात येतो.लगत भूमापन क्रमांक लिहिले जातात.टिपण आकृतीचे मोजमापानुसार वसलेवार पध्दतीने भूमापन क्रमांकाचे क्षेत्र कायम करण्यात येऊन त्यावर एकूण क्षेत्र,बागायत क्षेत्र,तरी/गद्दी याचा उल्लेख असतो.
  • ब) पक्के टिपण : यामध्ये प्रत्येक भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्र असते.त्यावर बांधमापे दर्शवून चालता नंबर,अंतिम नंबर,शेताचे नाव व सत्ता प्रकार इत्यादी बाबी नमुद केलेल्या असतात.

शेतवार पुस्तक

सदर पुस्तकात भूमापन क्रमांकानुसार क्षेत्र व आकार नमूद केलेला असतो.

कच्चा सुड

कोकण विभागात एकूण क्षेत्र दाखविण्याकामी सुड वापराला जातो. त्यामध्ये भूमापन क्रमांक,पोटनंबर, स्थळाचे नाव, जिरायत, बागायत यांचे क्षेत्र व आकार नमूद असतो.

पक्का सुड

यामध्ये भूमापन क्रमांक व त्यामध्ये पडलेल्या पोटहिस्स्याची स्केली आकृती असते.तसेच जमिनीचा प्रकार,भूमापन क्रमांक व पोट हिस्स्याचे असणारे खराबा क्षेत्र व आकार नमूद असतो.सदरचा पक्का सुड हा डोंगराळ भागातील गावासाठी ठेवण्यात येतो.

दरवारी

दरवारी मध्ये भूमापन क्रमांक,प्रत नंबर,कच्चा व पक्का आकार व क्षेत्र नमूद असते.

क्लासर रजिस्टर

यामध्ये भूमापन क्रमांक / पोटनंबर जमिनीचे प्रकारवार क्षेत्र,पोटखराब, जिरायत, बागायत व तरी याप्रमाणे दर व आकार नमूद केलेला असतो. तसेच गावापासून व पाण्यापासून असणारी लांबी, मैल वरुन कायम एकरी दर काढलेला असतो.

प्रतिबुक

जमाबंदी करतेवेळी प्रतबंदी करताना प्रत्येक भूमापन क्रमांकाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन त्याचे ठराविक चौकोन आखुन त्याप्रत्येक भागाची प्रत ठरविली जाते.प्रत्येक भागाचे / जमिनीचे प्रतिवार निरीक्षण करुन, त्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रतवारी प्रमाणे भागआणे काढले जातात व त्या भागआणे वरुन नंतर त्याचा एकरी दर कायम करुन, आकार बसविण्याचे काम केले जाते.त्याच्या नोंदी प्रतिबुक नोंदवही मध्ये करण्यात येतात त्यामध्ये भूमापन क्रमांक, मोजणी नंबर, डागाचे नाव, कर्दाचे नाव, जमिनीचा प्रकार, क्षेत्र, खराबा क्षेत्र, व लागवडी लायक क्षेत्र, इत्यादी नोंदी घेतल्या जातात.

क्षेत्रबुक

भूमापन क्रमांकाचे मोजणीअंती परिमाणात काढलेले रेखाचित्राचे क्षेत्र समाविष्ट असणारे मोजणीचे पुस्तक म्हणजे क्षेत्रबुक होय.यामध्ये धारकाचे नांव, सर्व्हे नंबर व त्याचे क्षेत्र, चालता नंबर, इ. बाबी नमुद असतात.

वसलेवार बुक

भूमापन क्रमांकाचे क्षेत्र काढण्यासाठी, भूमापन क्रमांकाचे काटकोन, त्रिकोण व समलंब चौकोन यात विभागणी करुन मोजमापाच्या सहाय्याने क्षेत्र गणना करण्याची पध्दत म्हणजे वसलेवार होय.

मोजणी केलेल्या भूमापन क्रमांकाची शंकु पध्दतीने त्रिकोण आणि समलंब चौकोनामध्ये विभागणी करुन, निश्चित परिमाणात मापे टाकण्यात येवून, गणितीय पध्दतीने प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्र नमुद करण्यात येते. अशा मोजणी केलेल्या सर्व भूमापन क्रमांकाची नोंद ज्या नोंद वहीत केलेली असते, त्या नोंदवहीस वसलेवार बुक असे म्हणतात.

बागायत तक्ता

वर्गकार, बागायत स.नं. करीता तक्ता तयार करतात. हया तक्त्यात वर्गीकरण करताना जी माहिती त्यांनी प्राप्त करुन घेतली, ती सर्व हयात सुध्दा नमुद केली जाते. विहीरीची नोंद, स.नं. चे हद्दी व हद्दीच्या निशाण्या (खुणा) तपासुन लिहून घेतात. वर्गकार सुध्दा प्रत्येक स.नं. ची नोंद ठेवतात. त्या स.नं.चे गांवापासूनचे अंतरही नोंदवतात. गांवनकाशा व गांव नोंदवही तयार करतात व ओलीताचे/पाण्याची साधने कोणकोणती आहेत. त्यांची नोंद त्यात करतात. तलाव, वोडी,कुंटा या पासुन पाणी शेतीला मिळते किंवा नाही याच्या नोंदी ठेवल्या जातात.

वाजिब-उल अर्ज

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 165 अन्वये जी कोणतीही जमिन किंवा जे पाणी राज्य सरकारच्या किंवा एखादया स्थानिक प्राधिकारी /संस्थेचे मालकीची नसेल किंवा त्याच्या कडुन ज्याचे नियंत्रण किंवा व्यवस्था केली जात नसेल अशा जमिनीतील किंवा पाण्यासंबंधातील

  • पाटबंधा-यांबाबतचा हक्क किंवा जाण्यायेण्याचा हक्क किंवा अन्य वहिवाटी
  • मच्छीमारीबाबतचे हक्क.

यासंबंधीचे प्रत्येक गावातील रिवाज ठरविले पाहिजेत आणि त्यांची नोंद केली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या अभिलेखास त्या गावाचा वाजिब - उल अर्ज म्हणून संबोधण्यात येते.

निस्तार पत्रक

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 161 अन्वये एखादया गावातील भोगवटयात नसलेल्या सर्व जमिनीच्या आणि तिच्याशी अनुषंगिक असतील अशा सर्व बाबींच्या , आणि विशेष करुन कलम 162 मध्ये निर्दिष्ट केले प्रमाणे गावातील गुरे चरण्यास ज्या अटीवर/ शर्तीवर परवानगी देण्यात येईल व लाकुड , इमारती लाकुड, किंवा इतर कोणतेही जंगलातील उत्पन्न इ.बाबींच्या व्यवस्थे संबंधीची योजना अंतर्भूत असलेले, एक निस्तारपत्रक जिल्हाधिकारीने तयार केले पाहिजे.

निस्तारपत्रकाचा मसुदा त्या गावामध्ये प्रसिध्द केला पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या रीतीने गावातील रहिवाशांची मते आजमाविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने त्यास अंतिम स्वरुप दिले पाहिजे. तसेच ग्रामपंचायतीने विनंती केल्या नंतर किंवा एखादया गावात ग्रामपंचायत नसल्यास अशा गावातील प्रौढ रहिवाशांपैकी एक- चतुर्थांशाहून कमी नसेल इतक्या रहिवाशांनी अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस, कोणत्याही वेळी, त्यास योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर निस्तार पत्रकातील कोणत्याही नोंदीत सुधारणा करता येईल.

आकार बंद

गावातील प्रत्यक्ष जमिनीची भूमापन मोजणी व जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भूमापन क्रमांकाचे क्षेत्र वसलेवार पध्दतीने काढले जाते. क्षेत्र काढताना जिरायत, बागायत,तरी(भातशेती) इत्यादी वेगवेगळे क्षेत्र नमुद केले जाते. त्याप्रमाणे(गाव नमुना नंबर 1) आकारबंद केला जातो.

एखादया गावाचे एकूण क्षेत्र,भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक,त्यांचे प्रत्येकी क्षेत्र,आकार, लागवडीचे क्षेत्र, पोटखराबा, सत्ताप्रकार, प्रतवारी, जमिन महसूल आकारणी,जमाबंदीची मुदत,तसेच एकूण क्षेत्र कोणकोणत्या प्रकाराखाली किंवा प्रयोजनासाठी वापरात आहे, त्याचा तपशील दर्शविणारा गाव नमुना नं.1 म्हणजे आकारबंद होय. आकारबंदा मध्ये गावचे एकुण क्षेत्र, लागणी लायक, खराबा त्याचा आकार या नोंदी संधारण केलेल्या आहेत.

आकार बंदाचे शेवटचे पानावर संपूर्ण भूमापन क्रमांकाच्या क्षेत्राची/ आकाराची बेरीज ही जमिनीचे वेगवेगळया प्रकारात दर्शविलेली असते. तसेच नाकीर्दसार म्हणून एक सदर असते, त्यात गावठाण, नदया,नाले, शिवेवरील भाग, ओढा, रस्ते, कॅनॉल,तलाव, रेल्वे, इ. क्षेत्राचा वेगळा उल्लेख असतो आणि शेवटी वर उल्लेख केलेल्या सर्वांचे क्षेत्राची एकत्रीत बेरीज केलेली असते. त्यास जुमला बेरीज असे म्हणतात.

गांवचे नकाशे

गाव नकाशा हा भूमापन अभिलेख आहे. कारण तो गावचे सर्व भूक्रमांक दर्शवितो.गाव नकाशा 1 इंच = 20 साखळी किंवा 10 साखळी या परिमाणात काढलेला आहे.आता दशमान पध्दत सुरु केल्यानंतर मोजणी प्रमाणित दशमान साखळीने केली जाते आणि गावनकाशे 1:5000 व 1:10000 या परिमाणात तयार केले जातात.गावाचा नकाशा मध्ये गावातील गावठांण, झाडे,विहिरी,डोंगर, टेकडी, ओढा, ओघळी , गाडी रस्ते, पांधण रस्ते, पक्के रस्ते,झुरी इ. बाबी नमुद असतात.गावच्या नकाशाच्या आधारे एखादया गट नंबरच्या किंवा गावाच्या दिशादर्शक चतु:सिमा समजून येतात.

अधिकार अभिलेख

बंदोबस्तानंतर वऱ्हाड मध्ये सर्व्हे नंबर नुसार कब्जेदारांचे हक्काचे अधिकार अभिलेख त्यांचे कब्जातील क्षेत्रावर तयार करणेत आले. मध्य प्रांत (नागपूर विभागामध्ये) खसरा पत्रक तयार करणेत आले. मराठवाडयात खासरा पत्रक तयार करणेत आले. पश्चिम महाराष्ट्रात क,ड,ई पत्रक तयार करणेत आले. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनयम 1966 लागू झाल्यानंतर अधिकार अभिलेख म्हणून (7/12) अंमलात आला याची माहिती खालील प्रमाणे आहे.अधिकार अभिलेख म्हणजेच 7/12 हा मूळ महसुल अभिलेख असून, महाराष्ट्र जमिन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम , 1971 यातील नियम 3,5,6 आणि 7 नुसार 7/12 तयार केला जातो. अधिकार अभिलेखामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

गाव नमुना 7

हे अधिकार अभिलेख पत्रक असून गाव कामगार तलाठी यांचेकडील दप्तरातील अत्यंत महत्वाची अशी नोंदवही आहे. त्यालाच आपण 7/12 म्हणून संबोधतो.

गाव नमुना नंबर 7 हा मालकी हक्काबाबतचा आहे. गाव नमुना 7 मध्ये सजा, गावाचे नाव,तालुका, जिल्हा, भूमापन क्रमांक, भूमापन क्रमांकाचा उपविभाग ,भूधारणा प्रकार ,भोगवटदाराचे नाव, खाते क्रमांक, क्षेत्र, आकार, कब्जेदाराचे नाव, इतर अधिकार, कुळ इ. माहिती असते.

गाव नमुना नं. 7 मध्ये नमुद करण्यात आलेल्या क्षेत्राचे परिमाण हे हेक्टर ,आर व स्क्वेअर मीटर मध्ये लिहीण्यात येते. तसेच गाव नमुना नं. 7 मध्ये लागवडी लायक क्षेत्र व पोटखराबा क्षेत्र वेगळे दर्शविण्यात येते. तसेच गाव नमुना नं. 7 च्या प्रत्येक नोंदीसाठी प्रत्येक नावासमोर फेरफार क्रमांक नोंदविला जातो.तसेच एका गाव नमुना नं. 7 वर एकच सत्ता प्रकार नमुद करण्यात येतो.

गाव नमुना नंबर 12

गाव नमुना नंबर 12 हा पिकासंबंधीचा आहे. गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंदी घेणे अभिप्रेत आहे. गाव नमुना नंबर 12 मध्ये दिलेल्या रकान्यातच पिकांच्या नोंदी कराव्यात व त्या खाली क्षेत्र लिहावे. यामध्ये मिश्रपिके, निर्भेळ पिक इ. तसेच पडीक जमिन पकार, सिंचनाचे साधन इ. नोंदी असतात. तसेच गाव नमुना नंबर 12 मध्ये इतर शेऱ्यामध्ये विहीर, झाडे इत्यादी तपशील नमुद केलेला असतो.

बंदोबस्तानंतरचे अभिलेख

फाळणी नकाशे :

एखादया भूमापन क्रमांकाचे रितसर हिस्से पाडण्यासाठी जागेवरील वहिवाटीची मोजणी करुन तयार केलेला नकाशा म्हणजे फाळणी नकाशा होय. फाळणी नकाशे हे सन 1956 पर्यंत शंकुसाखळीने तयार केलेले आहेत. त्यानंतर ते फलकयंत्राचे साहाय्याने तयार केलेले आहेत. फाळणी नकाशा आधारे पोटहिस्स्यांच्या गहाळ खुणांची स्थिती निश्चित करता येते. हद्दीचे वाद मिटविता येतात.

ज्या भूमापन क्रमांकामध्ये पोटहिस्से पडलेले आहेत त्याचे हिस्स्याप्रमाणे असलेल्या हद्दी योग्य त्या स्केलाप्रमाणे कायम करुन, यामध्ये भूमापन क्रमांकाच्या हद्दी काळया शाईने व पोटहिस्याच्या हद्दी तांबडया शाईने दर्शवून त्यात त्या- त्या पोटहिस्स्याचा क्रमांक नमुद केलेला असतो

गुणाकार बुक

जेव्हा एखादया भूमापन क्रमांकामध्ये किंवा गटामध्ये कोणत्याही कारणामुळे हिस्से पाडले जातात. तेव्हा मोजणीवेळी गुणाकार बुक (हिस्सा फॉर्म नं. 4 ) भरला जातो. संबंधित धारकाने दर्शविल्याप्रमाणे वहिवाटीप्रमाणे पोटहिस्स्यांची मोजणी करुन आलेले क्षेत्र रकाना क्रमांक 6 मध्ये लिहीण्यात येते. त्यानंतर सर्व्हे नंबरच्या एकुण क्षेत्राशी मेळ ठेवण्यासाठी क्षेत्र कमी अधिक रकाना क्रमांक 8 व 9 मध्ये भरुन सर्व्हे नंबर चे एकुण क्षेत्र रकाना क्रमांक 10 मध्ये कायम केले जाते. त्यावेळी प्रत्येक हिस्साच्या खातेदारांचे नाव/हजर असलेबाबत अंगठा किंवा स्वाक्षरी (रकाना क्रमांक 12 मध्ये) घेतली जाते. यामध्ये ज्या भूमापन क्रमांकाचे हिस्से करावयाचे आहेत त्यामध्ये खाष्टे पाडून अथवा त्रैराषिक पध्दतीने क्षेत्रफळ काढले जाते.पोटहिस्सा मोजणी करत असताना जमिन एकत्रीकरण योजना 1947 च्या नियमास अधिन राहून विहीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा हिस्सा / तुकडा पडणार नाही अशा रितीने जमिनीची विभागणी केली जाते. एकंदरीत सर्व्हे नंबर अथवा गट नंबर मध्ये जेव्हा विभागणी होते, तेव्हा मोजणी समयी जागेवर करावयाच्या / भरावयाच्या तक्त्याला गुणाकार बुक असे म्हणतात.

कमी- जास्त पत्रक

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील खंड 1 व 4 मध्ये कमी जास्त पत्राकाबाबत तरतूद केल्याप्रमाणे सर्व्हेनंबर/गटनंबरचे आकार व क्षेत्रामध्ये काही कारणांस्तव बदल झाल्यास गावच्या आकारबंदामध्ये बदल करण्यासाठी जो अभिलेख तयार केला जातो. त्यास कमी-जास्त पत्रक म्हणतात. असे कमी - जास्त पत्रक साधारणपणे खालील प्रकरणी तयार करावे लागते.

  • शेत जमिनीचा वापर बिनशेती प्रयोजनासाठी करावयाचा असल्यास
  • मूळ भूमापनामध्ये गणितीय किंवा हस्तदोषाने निर्माण झालेली चूक (क्षेत्र दुरूस्ती)
  • बिनआकारी जमिनीवर आकारणी करणे (मूळ भूमापनाच्या वेळी आकारणी न केलेल्या जमीनी), मळई जमीनींचे प्रदान इ.
  • भूसंपादन
  • नदी पात्रातील मळई जमिनीची वाढ व घट

अशा प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करावे लागते. यामध्ये मूळ भूमापन क्रमांक,हिस्सा क्रमांक, जमिनीचा प्रकार, एकुणक्षेत्र, खराबा वर्ग,लागवडीखालील क्षेत्र, आकार इ.बाबतच्या मुळ नोंदीमध्ये हिस्याप्रमाणे दुरुस्ती करुन नोंदी घेतल्या जातात. म्हणजेच कमी जास्त पत्रकामध्ये भाग 1 रकाना 1 ते 8 (दुरूस्ती पूर्वीची स्थिती) व उर्वरित भागात दुरूस्तीनंतरची स्थिती असते.

कोणत्याही कारणास्तव गांव नमुना 1 किंवा आकार बंदाचे गोषवाऱ्यातील क्षेत्र व आकार यामध्ये जेव्हा बदल करण्यात येतो. तो क.जा.प.चे माध्यमातूनच केला जातो. अशी क.जा.प.उप अधीक्षक भूमिअभिलेख, मंजुर करतात व उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापन अभिलेखात, नकाशात व आकारबंदाला नोंद घेऊन क.जा.प.ची एक प्रत उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे स्वाक्षरीने तहसिलदार यांचेकडे नकाशासह हक्क नोंदणी व गांव नमुना 1 मध्ये नोंद घेण्यासाठी पाठविली जाते. सदर पत्रकास कमी जास्त पत्रक असे म्हणतात.

आकारफोड पत्रक

भूमापनाचे वेळी सर्व्हे नंबरचे क्षेत्र व आकार, एकत्रिकरण योजनेवेळी गटाचे क्षेत्र व आकार कायम केलेला आहे. सदरहू सर्व्हे नंबर अथवा गट नंबर मध्ये पोटहिस्सा मोजणीने, कोर्टवाटपाने , भूसंपादनाने किंवा बिनशेती आदेशाने सदरहू सर्व्हे नंबर अथवा गट नंबरचा कमी -जास्त आकार केला जातो त्या पत्रकाला आकार फोड पत्रक असे म्हणतात.

कोर्ट वाटप करताना जमिनीचे खाष्टे पाडून जमिनीतील दोष पाहून, सरस - निरस मानाने आकार कमी/अधिक केला जातो. तिच पध्दत पोटहिस्सा मोजणीमध्ये सुध्दा वापरली जाते. परंतु हल्ली आकार फोड हे त्रैराषिक पध्दतीने केले जाते.आकार फोड पत्रकात सर्व्हे नंबर/गटनंबर, पोटहिस्स्याचा क्रमांक, त्याचे क्षेत्र , आकार, जमिनीचा प्रकार,लागणीलायक क्षेत्र, पोटखराबा इत्यादी बाबत 1 ते 26 प्रमाणे रकाने असतात.

भूमापन मोजणीचे प्रकार

हद्दकायम मोजणी

सन 1960 पासून महाराष्ट्र हे घटक राज्य अस्तित्वात आले. राज्यातील जमिन महसूल विषयक एकच कायदा असावा त्यादृष्टीने तत्पुर्वीच्या अधिनियमाच्या तरतुदी विचारात घेऊन महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चा कायदा तयार करण्यात आला.

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 136 मधील तरतुदी नुसार एखादया भूमापन क्रमांच्या हित संबंधित धारकाने भूमापन क्रमांकच्या हद्द कायम मोजणी साठी रितसर भूमि अभिलेख, विभागाकडे मोजणी फी भरून अर्ज केल्यास, सदर अर्जासमवेत मालकी हक्काचा 7/12 (अधिकार- अभिलेख) उतारा, या खात्याने निश्चित केलेली इतर पत्रे,लगतधारकांची पुर्ण नांवे व पत्ते व रितसर मोजणी फी भरलेले चलन जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर प्रकरण भूकरमापकाकडे देऊन अर्जदार यांना रितसर आगाऊ मुदतीची नोटीस देऊन अर्जदार व लगत धारक यांनी दाखविलेल्या वहिवाटी प्रमाणे फलकयंत्र, ई.टी.एस मशिन यांच्या सहाय्याने हद्दकायम मोजणी करुन अभिलेखाच्या आधारे मोजणी नकाशा कायम करण्यात येऊन,अर्जदार यांना हद्दीच्या खुणा कायम करुन दिल्या जातात.मोजणी कामाची सर्व पुर्तता झाले नंतर अर्जदार यांना मोजणी नकाशाची "क "प्रत पुरविणेत येते. अर्जदाराचे मोजणी कामी असणारी निकड गरज हे पाहून मोजणीचे प्रकार या विभागाकडुन निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये नियमित,तातडी,व अतितातडी असे प्रकार करण्यात आलेले आहेत.

पोटहिस्सा मोजणी

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85,86 व 87 अन्वये भूमापन क्रमांकाचे भूमि अभिलेख विभागाकडून पोटहिस्सा मोजणी करणेबाबतची तरतूद अंतर्भूत आहे.

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 कलम 149 मधील तरतुदी नुसार वारसाहक्काने,वाटपाने,खरेदीने,अकृषीक वापराने,जे नविन पोटहिस्से तयार होतात अशा नविन पोटहिस्साची यादी महसूल विभागकडुन आवश्यकत्या कागदपत्रसह 1 ) गावनमुना 7/12 चा उतारा, 2) गावनमुना नंबर 6 ड चे संपुर्ण पोटहिस्सा उत्तारे, 3) पोटहिस्साचा कच्चा नकाशा इत्यादी कागद पत्रासाह यादी प्राप्त झालेनंतर अथवा संबंधित धारकाने पोटहिस्सा जमिनीच्या/मिळतीची पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज केलेनंतर त्यांचेकडुन मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचेकडुन परिपत्रक क्रमांक भूमापन 3 मोजणी फी /प्र.क्र255/2010 दिनांक 06/02/2010 अन्वये प्रचलित केलेल्या मोजणी फी दराने नियमित/तातडी/अतितातडी दराने मोजणी फी आकारणी करुन भरणाकरुन घेणेत येऊन संबंधित मोजणी रजिस्टरला नोंदी घेऊन सदरचे प्रकरण मोजणीसाठी भूकरमापकाकडे देणेत येते.भूकरमापक यांनी जमिनीतील प्रत्येक पोटविभागाची दाखविलेल्या वहिवाटी नुसार मोजणी करुन गुणाकारबुक (हिस्सा फॉर्म नं. 4 ) भरले जाते. सदर प्रकरण कार्यालयात जमा केलेनंतर सदरचे प्रकरण दुरुस्तीसाठी वर्ग केले जाते.पोटहिस्सा प्रकरणी आकारफोड पत्रक (नमुना नंबर 11 ) व फाळणीबारा (नमुना नंबर 12)तयार करणेत येवून ते अभिलेख गाव वहिवाटीस पाठविणेत येतात.

भूसंपादन संयुक्त मोजणी

सार्वजनिक प्रयोजनासाठी ज्या ज्या वेळी खाजगी जमिनीची आवश्यकता भासेल त्या-त्यावेळी शासन जमिन भूसंपादन अधिनियम 1894 तरतुदी नुसार जमिन संपादन करणेत येते.जिल्हाधिकारी यांचेकडुन प्रकरणांची सर्व पूर्तता झालेची खात्री झालेनंतर सदरचे प्रकरण मोजणी साठी या विभागाकडे प्राप्त होते.सदर प्रस्तावासोबत कागद पत्राची पडताळणी केलेनंतर सदरचे प्रकरण भूसंपादन मोजणी रजिष्टर नोंदवहिस नोंदविणेत येते.तदनंतर कार्यालय प्रमुख हे सदरचे प्रकरण मोजणीसाठी भूकरमापक यांचेकडे वर्ग करतात.भूकरमापक हे मोजणीकामी आवश्यक असणारे सर्व अभिलेख, अभिलेख कक्षातून काढून घेतात.त्यानंतर भूकरमापक हे संबंधित संपादन मंडळ,संबंधित भूसंपादन अधिकारी,गावकामगार तलाठी,ज्याच्या जमिनी संपादन होणार आहेत त्या भूधारकांना आगाऊ नोटीशीने कळवुन मोजणी तारखेला भूसंपादन मंडळाकडील रेखाकिंत नकाशा आधारे व सिंमाकना आधारे मोजणी करतात.सदर मोजणी नकाशावर संपादन मंडळाच्या हजर असणा-या अधिकारी व संबंधित भूधारक यांच्या स्वाक्षरी घेऊन कामाची पुर्तता करतात सदर संयुक्त मोजणी नकाशाच्या व संयुक्त विवरण पत्राच्या पाच(अ,ब,क,ड,ई) प्रति तयार करतात.

मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचेकडील क्रमांक एल आर 527/सीआर 3501/ल-3 दिनांक 13/04/1993 चे परिपत्रकातील सुचने नुसार जागेवरील आढळून आलेल्या विहीरी, इमारती,मोठी झाडे, टेलिफोन खांब,विज खांब,फळझाडे,इत्यादी मोजणी आलेखात व संयुक्त मोजणी विवरण पत्रात नोंदी घेण्यात येतात. सदर मोजणी काम पुर्ण झालेनंतर संयुक्त विवरण पत्राच्या व मोजणी आलेखाच्या तीन प्रती (क,ड,ई) सविस्तर अहवालासह भूसंपादन अधिकारी यांचेकडे पाठवितात.भूसंपादन मोजणी मध्ये तयार केलेला अ अभिलेख हा कायम स्वरुपी जतन केला जातो. भूसंपादनाच्या मंजूर निवाडयानंतर तो नक्कल देणेस पात्र ठरतो.

कोर्टवाटप मोजणी

जमिनीचे मालकी हक्काबाबत धारकामध्ये वाद निर्माण होऊन दिवाणी कोर्टात दावे दाखल होतात. सदर दाव्यामध्ये कोर्टाकडून सुनावणी घेऊन त्यामध्ये वादी व प्रतिवादी यांचे भाग कायम करण्यात येऊन ते प्रकरण महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 कलम 85 अन्वये जमिन वाटपाबाबचे अधिकार जिल्हाधिकारी यानां प्रदान करणेत आलेले आहेत. त्या शक्तीचा वापर करुन जिल्हाधिकारी हे त्याचे अधिनस्त तहसिलदार यांचेकडे वाटप प्रकरण वर्ग करतात. तहसिलदार यांचेकडुन सदरचे प्रकरण जागेवरील मोजणी करण्यासाठी उपअधिक्षक भूमि अभिलेख यांचेकडे पाठविणेत येते.तद् नंतर सदर प्रकरणी वादी यांचेकडून रितसर मोजणी फी भरुन घेऊन प्रकरणी कोर्टाचे आदेशाप्रमाणे व तुकडेबंदी व तुकडेजोड या कायदयाच्या तरतुदी नुसार व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 पार्टीशन रुल्स 1967 मधील नियम 5 व 6 अन्वये मोजणी कामाची पुर्तता करुन प्रकरण तहसिलदार यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडून मा. न्यायालयास कामाच्या पूर्ततेसह फेर सादर केले जाते.

कोर्टकमिशन मोजणी

जमिनीचे हद्दीबाबत धारकामध्ये वाद निर्माण होऊन दिवाणी कोर्टात दावे दाखल होतात.सदर दाव्यामध्ये दिवाणी न्यायालयात वादी व प्रतिवादी याच्यां बाजू ऐकून घेऊन नि:पक्षपातीपणे निर्णय होणेसाठी या विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करणेत येऊन सदरचे प्रकरण मोजणी साठी भूमि अभिलेख खात्याकडे पाठविणेत येते.सदरचे प्रकरण प्राप्त झालेनंतर वादी यांचेकडुन मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचेकडुन परिपत्रक क्रमांक भूमापन 3 /मोजणी फी /प्र.क्र 255/2010 दिनांक 06/02/2010 अन्वये प्रचलित केलेल्या मोजणी फी दराने तातडीची मोजणी फी आकारणी करुन भरणाकरुन घेऊन कोर्टकमिशन मोजणी नोंदवहित प्रकरण दाखल करुन घेतात.तद् नंतर या खात्याचे निमतानदार श्रेणीतील कर्मचा-यास मोजणी प्रकरण देण्यात येते.प्रकरणी कोर्टाने निहित केलेल्या कालावधीची नोटीस वादी व प्रतिवादी यांना रजिस्टर पोष्टाने पाठवून नेमलेल्या तारखेस वादी व प्रतिवादी यांनी दाखविलेल्या वहिवाटी प्रमाणे मोजणी करुन संबंधिताचे जाब-जबाब घेऊन कामाची पूर्तता करतात.अभिलेखातील अभिलेखाच्या आधारे मोजणी नकाशा कायम करुन वाद असलेल्या हद्दीबाबत संयुक्तिक टिप नमुद केली जाते. सर्वपूर्ततेसह प्रकरण कोर्टाकडे फेर सादर केले जाते.

बिनशेती मोजणी

एखादया जमिन धारकास त्याच्या जमिनीची अकृषिक प्रयोजनासाठी वापर करणेचा असलेस महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 कलम 44 अन्वये महसूल विभागीची परवानगी घेऊन वापर सुरु करण्याची प्रयोजन असून त्यामध्ये संबंधित धारकांने मोजणी करुन घेणेची शर्त नमुद केलेली असते. त्यानुसार एक महिन्याचे आत मोजणी करुन घेण्याचे बंधन संबंधित धारकांस घालण्यात आलेले आहे.अशा धारकांने या खात्याकडे बिनशेती आदेशासह मोजणी अर्ज करणे आवश्यक आहे.संबंधित धारकाने मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचेकडुन परिपत्रक क्रमांक भूमापन 3/ मोजणी फी /प्र.क्र255/2010 दिनांक 06/02/2010 अन्वये प्रचलित केलेल्या मोजणी फी दराने नियमित/तातडी/अतितातडी दराने मोजणी फी आकारणी करुन भरणा करुन घेणेत येतो. तद् नंतर मोजणी प्रकरण प्राप्त झालेनंतर संबंधित नोंदवहित नोंदी घेऊन प्रकरण मोजणीसाठी भूकरमापक यांचेकडे देण्यात येते.भूकरमापक यांनी मोजणी कामाची प्रचलित कार्यपध्दती नुसार पूर्तता करुन सर्व प्रकरण कार्यालयात जमा करतात.सदरचे प्रकरणाची छाननी करुन प्रकरण दुरुस्ती कडे वर्ग करुन त्यामध्ये कमी-जास्त पत्रक तयार करुन ते गाव वहिवाटीस रवाना केले जाते.