नागरी भूमापन विभाग

नगर भूमापनाची प्रारंभिक माहिती :-

भूमि अभिलेख विभाग हा महसुल विभागाचा पाया असुन या विभागाने तयार केलेल्या जमीनीचे घर मिळकतीचे नगर भूमापन अभिलेखा आधारे राज्यातील विविध विभागाकडून विकासात्मक कामे करण्याची कार्यवाही केली जाते. मिळकत धारकांचे हक्क विषयक वादात निर्णय करणेत येतो. पर्यायाने या विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अभिलेखाचे आधारे राज्यातील महसुली उत्पन्नात वाढ होणेचे दृष्टीने वाटचाल होते.

कायदेशीर तरतुदी :-

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण आठ कलम 121 ते 131 च्या तरतुदीनुसार गांवाचे/नगराचे /शहराचे नगर भूमापन केले जाते. कलम 126 नुसार नगर भूमापन मोजणी करणेत येते.

 

कोणत्याही गांव/नगर /शहरांचे नगर भूमापन करणेपुर्वी प्रथमत:

नगर भूमापन हद्दीत कोणत्या जमीनी समाविष्ट करणे आवश्यक आहे याचा आढावा घेवून गांवाचा औद्योगिक विकास, गांवाची नागरीकरणाची वाढ इत्यादी बाबी तसेच इमारतीसाठी ज्या जमिनी लागण्याची शक्यता आहे याचा विचार करुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 122 च्या तुरतुदीनुसार नगर भूमापनाची हद्द ठरविणेत येते.

नगर भूमापनाचे उद्देश :-

नगर भूमापनाचे प्रशासकीय, राजकोषीय व कायदा हे तीन उद्देश आहेत.

प्रशासकीय उद्देश:-

टपाल, पोलीस,विदयुत,स्वच्छता, जनगणना इत्यादी खाती व नगरपालिका अगर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उपयोगासाठी , शहरातील रस्ते, घरे,कार्यालये इत्यादी प्रदेश वर्णनात्मक तपशील दर्शविणारा अचूक नकाशा पुरविणे हा होय. पाणी पुरवठा ड्रेनेज, रेल्वे विद्युतीकरण, गॅस व दुरध्वनी कनेक्शन या योजनांसाठी परिपुर्ण अथवा मोठया नकाशाची आवश्यकता असते. तर शैक्षणिक संस्था, वैदयकीय मदत, अग्नीशामक उपाय व जकात वसुली या सर्व गोष्टी शहरांच्या नकाशावर अचूक असतात.

राजकोषीय उद्देश:-

जमिनीपासुन येणे असलेल्या महसुलाची खात्री करणे आणि भविष्यातील महसुलाच्या विकासाकडे लक्ष देणे. तसेच सार्वजनिक जमीनीचे अतिक्रमणापासुन संरक्षण करणे आणि त्याची विक्री अथवा चोरुन विनियोग न घेणे हा आहे.

कायदेशीर उद्देश:-

अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करणे व जे योग्य असतील त्यांना पाठिंबा देणे व त्यांचे उत्तम प्रकारे निर्धारिकरण करणे व जे अयोग्य आहे ते काढून टाकणे, मिळकत धारकामधील गुंतागुंतीचे दावे थांबविणे,खाजगी दावेदार व स्थानिक संस्था किंवा सरकार यांचेमधील हया बाबतचे शंकाचे निरसन करणे तसेच त्यांचेमधील होणारे वरीलप्रमाणे दावे थांबविणे हा होय.

 

नगर भूमापन कामाचे टप्पे :-

नगर भूमापनाची कामे साधारणात: खालील टप्प्यात करण्यात येतात.
  1. ट्राव्हसिंग. (दुर्बिण मोजणी काम)
  2. सविस्तर मोजणी.
  3. नगर भूमापन हक्क चौकशी काम.
  4. सनद व मिळकत पत्रिका तयार करणे.
  5. शुल्क आकारणी व वसुली.
  6. नगर भूमापन अभिलेख परिरक्षणास घेणे.

हक्क चौकशीबाबत कायदेशीर तरतुदी :-

नगर भूमापन करावयाचे क्षेत्रातील प्रत्येक मिळकतीची मोजणी करणेत येते. मोजणी केलेल्या प्रत्येक मिळकतीचा हक्क ठरविण्याचे काम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 20(2) मधील तरतुदीनुसार व तसेच गांव, नगर व शहर भूमापन नियम 1969 मध्ये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार भूमि अभिलेख विभागातील उपअधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांचेकडून करणेत येते.

चौकशी अधिकारी यांनी चौकशी करुन हक्क कायम केलेनंतर त्यामिळकतीचे अधिकार अभिलेख तयार करणेत येतात.

नगर भूमापन अभिलेखाचे परिरक्षणांचे काम भूमि अभिलेख विभागातील परिरक्षण भूमापक / निमतानदार यांचेकडून करणेत येते. नगर भूमापन योजनेकामी झालेला खर्च सर्व मिळकत धारकांना त्यांचे मिळकतीची सनद देवून सनद फी च्या स्वरुपात वसुल करणेत येतो.

नगर भूमापनची फी त्या जमीनीच्या धारण करणा-याने दयावयाची असते, त्यानंतर त्याला हक्काची सनद देण्यात येते. या सनदेमध्ये धारकाचे नांव,धारण जमीनीचे क्षेत्रफळ, चतु:सिमा वगैरे बाबीचा तपशील असतो.

अपील :-

नगर भूमापन मिळकतीचे चौकशी काम चौकशी अधिकारी यांचेकडून पुर्ण झाल्यानंतर सदर चौकशी अधिकारी यांनी निर्णय देवून धारक घोषीत केलेल्या मिळकतीबाबत हितसंबंधीत व्यक्तीस जर हक्क निर्णय मान्य नसलेस त्या निर्णयावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अनुसुची- ई प्रमाणे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडे आवश्यक त्या पुराव्याच्या कागदपत्रासह प्रथम अपील दाखल करुन दाद मागता येते. तसेच जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे निर्णयावर व्दितीय अपील उपसंचालक भूमि अभिलेख यांचेकडे दाखल करुन दाद मागता येते.

नगर भूमापनाकडील अभिलेख :- नगर भूमापन कार्यालयात खालीलप्रमाणे अभिलेख संधारण केले जातात.
नगर भूमापनाचे मुळ आलेख :-
आलेख1:500 प्रमाणात असतात. यावर नगर भूमापन मिळकतीची प्रमाणभूत आकृती नगर भूमापन क्रमांकासहित असते. मिळकती मधील बांधकाम व खुले क्षेत्र स्वंतत्ररित्या दर्शविलेले असते.
टिपण‍ अथवा फिल्डबुक :-
यामध्ये मिळकत धारकांचे मिळकतीचा कच्चा नकाशा व मिळकतीची लांबी रुंदीची मापे नमूद केलेली असतात.
वसलेवार बुक:-
नगर भूमापन योजनेच्या वेळी केलेल्या मोजणी प्रमाणे प्रत्येक मिळकतीचे क्षेत्र परिगणित केलेले पत्रक.
चौकशी नोंदवही:-
यामध्ये मुळ धारक हक्क चौकशी बाबतचे निर्णय असतात.
मिळकत पत्रिका:-
हा अधिकार अभिलेखाचा प्रकार असुन संबधीत मिळकतीचे नगर भूमापन क्रमांक,क्षेत्र, धारणाधिकार, मिळकत धारकांचे नांव व सुविधाधिकार यांचा उल्लेख असतो.

वर नमुद केलेले अभिलेखांच्या प्रमाणित प्रती जनतेस मागणीनुसार संबंधीत कार्यालयाकडून आवश्यक ते शुल्क भरणा करुन पुरविणेत येतात. सदर प्रमाणित प्रतीचे दर कार्यालयाचे वेबसाईटवर परिपत्रक सदरी उपलब्ध करुन दिलेली आहेत.

नगर भूमापन हद्दीतील मोजणी काम:- नगर भूमापन कार्यालयाकडून अर्जदाराच्या मागणीप्रमाणे पुढीलप्रमाणे मोजणी काम केले जाते. 1)नगर भूमापन हद्द कायम 2)पोटहिस्सा 3)सामीलीकरण 4)कोर्टवाटप 5)कोर्टकमिशन 6) भूसंपादन

सदर मोजणीसाठी मोजणी फीचे दर कार्यालयाचे वेबसाईटवर परिपत्रक सदरी उपलब्ध करुन दिलेली आहेत.

नगर भूमापन कार्यालयाची संख्यात्मक माहिती :- सद्यस्थितीत राज्यात पुणे,मुंबई,नाशिक,औरंगाबाद,व नागपूर विभागात खालील नमूद केले प्रमाणे नगर भूमापन कार्यालय कार्यरत आहेत.

अ . क्र विभागांचे नांव नगर भूमापन कार्यालयाची संख्या
1 पुणे 8
2 मुंबई 13
3 नाशिक 5
4 औरंगाबाद 1
5 नागपूर 3
  एकुण 30

नगर भूमापन कार्यालयाची कार्ये :-

वरील नमूद केलेल्या नगर भूमापन कार्यालयामध्ये खालील प्रमुख कार्य पार पाडली जातात.
  1. मिळकत पत्रिकेवरील हक्कात बदल झालेस त्याबाबतच्या नोंदी करणे. उदा. खरेदी, विक्री,वाटप,बोजा व तारण /गहाण खत इ.
  2. मिळकतीचे हद्दी बाबत वाद निर्माण झाल्यास त्याची मोजणी करुन अभिलेखानुसार मोजणी हक्क कायम करणे.
  3. नगर भूमापन हद्दीतील सरकारी जागेवरील अतिक्रमणे शोधणे व जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करणे.
  4. मिळकतीमध्ये जागेवर असणारे बदल कालबध्द पध्दतीने नकाशात नोंदविणे. (पुनर्विलोकन)

खाजगी संस्थेमार्फत करणेत येणारे नगर भूमापन काम :-

नगरपालिकांना त्यांच्या जमीन विषयक सर्व प्रकरणांत दैनंदिन कामकाजासाठी नगर भूमापनाची आवश्यकता असते. तसेच शहराची विकास योजना तयार करताना नगर भूमापन अभिलेखांचा अत्यंत उपयोग होतो. परंतु ब-याच नगर पालिकांचे नगर भूमापन काम झालेले नाही. त्यामुळे शासनाचे महसूल व वन विभाग यांचेकडील अधिसूचना‍ क्रं. सिटीएस 1099/प्र.क्रं.214/ल-1, दि.6/10/2000 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (गांव, शहर व नगर भूमापन)(सुधारणा) नियम 2000 मधील नियम 4 नुसार जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख यांचेकडून पद निर्देशित करण्यात येईल अशा नियंत्रण व प्रभारी अधिका-यांच्या अधीन राहून अशी भूमापनाची कामे एकतर पुर्णत: किंवा अशत: खाजगी संस्थमार्फत करुन घेता येतील. तथापि खाजगी संस्थमार्फत करावयाच्या भूमापनासाठी होणारा खर्च सोसण्यास संबंधीत महानगरपालिका, नगरपालिका किंवा इतर शासकीय संस्था किंवा संघटना तयार आहेत या शर्तीस अधीन राहून खाजगी संस्थेची निवड करण्याचे निकष कार्यपध्दती अटी व शर्ती तांत्रिक गुणवत्ता जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख यांचेकडून ठरविण्यात येतील अशी तरतुद करणेत आली आहे.

महानगरपालिका हद्दीतील विस्तारीत क्षेत्राचे नगर भूमापन:-

त्याअनुषंगाने पुणे विभागातील पुणे महानगरपालिका व कोंकण विभागातील ठाणे, मिरा भाईंदर व कल्याण डोंबिवली या 3महानगरपालिकेच्या विस्तारीत क्षेत्रांचे नगर भूमापनाचे काम खाजगी संस्थामार्फत करुन घेणेची परवानगी शासनाकडून प्राप्त झालेली आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र विभागांचे नांव महानगरपालिकेचे नांव शासन निर्णय क्रं. व दिनांक
1 पुणे पुणे (समाविष्ट 23 गांवे ) महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रं. संकीर्ण1006/प्र.क्रं.318/ल-1, दि.17/03/2007.
2 मुंबई 1) ठाणे (समाविष्ट 32 गांवे ) महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रं.नभूमा1099/प्र.क्रं.214/ल-1, दि.6/11/2000.
2) मिरा भाईंदर (समाविष्ट 19गांवे ) महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रं.नभूमा1005/1605/प्र.क्रं.11/ल-1, दि.30/01/2006.
3) कल्याण – डोंबिवली (समाविष्ट36 गांवे ) महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रं.संकीर्ण1004/273/प्र.क्रं.44/ल-1, दि.30/05/2005.

उपरोक्त महानगरपालिका हद्दीतील विस्तारीत क्षेत्राचे खाजगी संस्थेमार्फत करणेत येणारे नगर भूमापनाचे सविस्तर मोजणी काम प्रगतीत आहे.

सदर सविस्तर मोजणीचे काम पुर्ण होताच हक्क चौकशी काम हाती घेणेचे दृष्टीने पुणे महानगरपालिकेसाठी दि.4/05/2010 व कोंकण विभागातील महानगरपालिकेसाठ दि. 18/08/2011 या कार्यालयाकडून चौकशी अधिकारी यांचे आस्थापना निर्माण करणे बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणेत आलेला आहे.

नगरपालिका/नगरपरिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन:-

तसेच नगर भूमापनाचे काम तातडीने सुरु होणेचे दृष्टीने महसुल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रं.संकीर्ण 1006/प्र.क्रं.301/ल-1, दि.16/08/08 व दि.22/09/2009 अन्वये राज्यातील 61 नगर परिषदांचे हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करणेबाबत खाजगी संस्थेकडून करुन घेणेसाठी मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यांचा विभागवार नगरपरिषद निहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र विभागांचे नांव नगरपरिषद/ नगरपालिकेचे नांव
1 पुणे 1) मैंदर्गी 2) मलकापूर.
2 मुंबई 1) नवघर माणिकपूर2)नालासोपारा 3) विरार 4)श्रीवर्धन 5)राजापूर 6) वैगुर्ला
3 औरंगाबाद 1)कन्न्ड 2)खुलताबाद 3)भोकरदन जालना 4)गंगाखेड परभणी 5)परतुर6)मानवत 7 सोनपेठ 8)पुर्णा 9)सेलू 10)जिंतूर 11) पाथरी 12)वसमत 13)कळमनुरी 14)देगलूर 15) मुदखेड 16)कंधार 17)धर्माबाद 18)मुखेड 19)किनवट20)अंबेजागाई 21)गेवराई 22)उमरगा 23)उदगीर 24)मांजलगांव 25)गंगापूर26)बिलोली 27)उमरी 28)हदगांव 29)धारुर 30)भूम 31)परांडा 32)मुरुम33)नळदुर्ग 34)निलंगा 35)अहमदपूर 36)कुंडलवाडी
4 अमरावती 1) मोर्शी 2)चांदुररेल्वे 3)चांदुरबाजार 4) मेहकर 5) देऊळगांव राजा 6)दारव्हा 7)उमरखेड 8)घाटंजी 9) तेल्हारा 10)पातूर 11) मंगळूरपीर
5 नागपूर 1)खापा 2)मोवाड 3)मोहपा 4)तिरोडा 5)सिंदी रेल्वे 6)राजुरा

शासनाकडील दिनांक 06/10/2000 चे अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन जमाबंदी आयुकत पुणे यांनी उपरोल्लेखीत नगर पालिका/नगरपरिषदाचे नगर भूमापन करणेसाठी 15 खाजगी संस्थेची निवड केलेली आहे. सदर खाजगी संस्थेकडून नगर परिषदेच्या हद्दीतील क्षेत्राचे आधुनिक यंत्रसामुग्री व्दारे सविस्तर मोजणीचे काम प्रगतीत आहे.

सदर सविस्तर मोजणीचे काम पुर्ण होताच हक्क चौकशी काम हाती घेणेचे दृष्टीने या कार्यालयाकडून चौकशी अधिकारी यांचे आस्थापना निर्माण करणे बाबतचा प्रस्ताव शासन दि. 18/08 /2011 सादर करणेत आलेला आहे.

गांवठाण भूमापन:-

शासनाचे महसूल विभागाकडील निर्णय क्रं.सिटीएस5760/22408-सी, दि.16/03/1964 अन्वये राज्यातील नगर पालिका/नगर परिषद नसलेल्या मोठया गांवातील गांवठाण जमीनीचे भूमापन करणेस शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्याअनुषंगाने त्यावेळी राज्यात पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ व मराठवाडा हे प्रांत अस्तित्वात होती. तेथील अस्तित्वात असलेल्या कायदयानुसार गांवाचे नगर भूमापन मोजणी काम सुरु आलेले होते.

कायदेशीर तरतुदी :-

राज्यात सन 1966 नंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंमलात आला आहे. त्याअनुषंगाने संपुर्ण राज्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील प्रकरण आठ चे कलम 127(1) मध्ये ज्या गांवाची लोकसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे अशा गांवाचे कलम 126 च्या उपबंधान्वये भूमापन लागू करण्याची तरतूद आहे.

गांवठाण भूमापन झालेल्या गांवाची संख्यात्मक माहिती :-

भूमि अभिलेख विभागाकडून 2000 लोकसंख्येवरील गांवाचे भूमापन करणेत आलेले आहे त्याचा विभागवार तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र विभाग गांवाची संख्या गांवठाण भूमापन झालेली गांवे
1 पुणे 2130 1537
2 मुंबई 895 304
3 नाशिक 1639 1065
4 औरंगाबाद 1540 853
5 अमरावती 756 477
6 नागपूर 715 443
  एकुण 7675 4679

गांवठाण भूमापनाचे काम भूमि‍ अभिलेख विभागातील आस्थापनेकडून करणेत येते. सद्या पुणे अमरावती व नागपूर या विभागात विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख (गांवठाण) यांची एकुण 5 कार्यालये कार्यरत असुन त्यांचेकडून 2000 लोकसंख्येवरील गांवाचे सविस्तर मोजणीचे काम प्रगतीत आहे.