ई अभिलेख

अभिलेख कक्षाचे आधुनिकीकरण

पथदर्शी प्रकल्प - तहसिलदार, हवेली, मुळशी आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख ,
हवेली मुळशी कार्यालयाकडील अभिलेखांचे स्कॅनिंग

राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अभिलेख कक्षाचे आधुनिकीकरण करणे या घटकाची अंमलबजावणी करावयाची आहे. अभिलेख कक्षाच्या आधुनिकीकरणामध्ये तहसिलदार आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील अधिकार अभिलेखाशी निगडीत महत्वाच्या अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम करण्यात येणार आहे.

अधिकार अभिलेखाशी निगडीत भूमि अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुणे जिल्हयातील तहसिलदार, हवेली, मुळशी व उप अधीक्षक भूमि अभिलेख , हवेली, मुळशी या कार्यालयात दिनांक 01/12/2011 पासुन राबविण्यात येत आहे. सदरचे काम हे मेसर्स विद्या ऑन लाईन प्रा.लि. पुणे या संस्थे मार्फत करणेत येत आहे. अभिलेखांचे स्कॅनिंग करुन त्याची मेटा डेटा एन्ट्री करुन ते साठविण्याकरिता आवश्यक असणारे सॉफ्टवेअर (DMS Document management System ) मेसर्स विद्या ऑन लाईन प्रा.लि. पुणे यांनी विकसीत केलेले आहे. या सॉफ्टवेअरचा Source Code आणि IPR हा महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा रहाणार आहे.

सदर पथदर्शी प्रकल्पामध्ये तहसिलदार, हवेली, मुळशी व उप अधीक्षक भूमि अभिलेख , हवेली , मुळशी या कार्यालयाकडील खालील प्रकारच्या अभिलेखांचे स्कॅनिंग व मेटा डेटा एन्ट्रीचे काम करण्यात आलेले आहे.

तहसिलदार कार्यालयातील स्कॅनिंग केलेले अभिलेख

 1. जुने 7/12
 2. जुने फेरफार नोंदवही
 3. चालु खाते नोंदवही (गाव नमुना 8अ ) उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग केलेले अभिलेख
  1. टिपण
  2. गुणाकार बुक
  3. आकारफोड
  4. कमी जास्त पत्रक
  5. आकारबंद
  6. दुरुस्ती योजना योजनापत्रक / एकत्रिकरण योजना
  7. एकत्रिकरण जबाब धारिका
  8. शेतपुस्तक

अभिलेखांच्या स्कॅनिंग कामाचा पथदर्शी प्रकल्प तहसिलदार, हवेली, मुळशी, उप अधीक्षक भूमि अभिलेख हवेली,मुळशी या कार्यालयात राबवितांना खालील प्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यात आलेली आहे.

अभिलेख कक्षामधील सर्व अभिलेख प्रकार निहाय व्यवस्थीत अभिलेखकक्षामध्ये लावुन घेण्यात आले. जे अभिलेख फाटलेले आढळुन आले ते चिकटपट्टीने व्यवस्थीत चिकटवुन घेण्यात आले. अभिलेखांच्या नोंदवहीला पानांक करण्यात आले. मेसर्स विद्या ऑन लाईन प्रा.लि. पुणे यांना स्कॅनिंग करता अभिलेख देतांना व स्कॅनिंग काम पुर्ण करुन झाल्यानंतर अभिलेख पुन्हा परत घेतांना करावयाच्या कार्यवाहीवर नियंत्रण रहावे या करिता नोंदवही तयार करुन त्यामध्ये नोंदी घेण्यात आल्या. अभिलेखांचे स्कॅनिंग काम झाले बरोबरच त्याची मेटा डेटा एन्ट्री करण्यात आली. स्कॅनिंग व मेटा डेटा एन्ट्री कामाचे मेसर्स विद्या ऑन लाईन प्रा.लि. पुणे यांचे कडुन व्हेरिफिकेशन व व्हॅलिडेशन करण्यात आले. याच बरोबर कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे कडुन केलेल्या कामाचे 100 % व्हेरिफिकेशन व व्हॅलिडेशन करण्यात आले आहे. संस्थेने केलेल्या स्कॅनिंग व मेटा डेटा एन्ट्री कामाबाबत दिलेल्या संख्यात्मक अहवालाची संबंधीत कार्यालय प्रमुख याचे कडुन खात्री करुन घेण्यात आलेली आहे.

तहसिलदार, हवेली, मुळशी आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख, हवेली, मुळशी यांनी सदर पथदर्शी प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यासाठी कार्यालयीन कर्मचा-याचे पथक तयार करुन मोहिम स्वरुपात हे काम पुर्ण केलेले आहे.