ई पुनर्मोजणी

महाराष्ट्र राज्याच्या जमिनीचा सर्व्हे 100 वषापूर्वी ब्रिटीश कालावधीमध्ये प्रथमत: झाला आहे. त्यानंतर वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे मुळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होवून जमिनीचे मोठया प्रमाणावर पोटविभाजन झाल्याने प्रत्यक्ष वहिवाट, भूमि अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात मेळ राहिलेला नाही. तसेच जुने बांध, वरळया नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या हद्दीचे वाद सोडवणुक करणे कठीण झालेले आहे. संबंधीत शेतक-यांच्या शेताची सिमा मोजणी अभिलेखाप्रमाणे निश्चित करणेत अडचणी येत आहे. त्यामुळे जमिनी विषयक वाद मोठया प्रमाणावर निर्माण होउन विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत, म्हणुन महाराष्ट्र राज्याची पुर्नमोजणी करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

पुनर्मोजणीसाठी येणा-या अडचणी व त्यासाठी आवश्यक असलेला खर्च याबाबत अभ्यास करणेसाठी डोंगरी भाग, औद्योगिक क्षेत्र, निवासी भाग, वनजमिनी, नदी-नाले यांचा समावेश असलेली पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्यातील पिरंगूट व त्यालगतची एकुण 12 गावांत पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर 12 गावांचे एकुण क्षेत्र 6734 हे. आर. इतके असुन त्याची मोजणी 1. ई टि एस / डी जी पी एस (प्यूअर ग्राउंड पध्दत) व 2. सॅटेलाईट इमेजरी आणि ई टि एस / डी पी पी एस (हायब्रीड पध्दत) या दोन्हीही पध्दतीने करण्यात येणार आहे.

सदर प्रकल्पामध्ये ई टि एस / डी जी पी एस (प्यूअर ग्राउंड पध्दत) या पध्दतीने पुनर्मोजणीचे काम करणेसाठी सर्व्हे ऑफ इंडिया यांचेकडून स्थापित करणेत आलेल्या ग्राउंड कंट्रोल पॉईंट नेटवर्कच्या आधारे, 16 चौ. कि. मी. अंतरावर प्रायमरी, 4 चौ. कि. मी. अंतरावर सेकंडरी आणि 1 चौ. कि. मी. अंतरावर टरशरी व त्यास सहाय्यकारी म्हणुन 200 मीटर अंतरावर ऑक्झीलरी असे एकुण 176 ग्राउंड कंट्रोल पॉईंटची उभारणी करण्यात आलेली असून त्याचे डिफरेन्शिअल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (डी जी पी एस) यंत्राच्या सहाय्याने अक्षांक्ष व रेखांशाचे रिडींग घेण्याचे काम पुर्ण झालेले आहे. सदर 12 गावांपैकी 6 गावांमध्ये ट्रॅव्हर्सिंगचे काम पुर्ण झाले असुन सविस्तर मोजणीचे काम सुरु झालेले आहे. सदरचे काम हे भूमि अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून करणेत येत आहे. त्यासाठी 2 भूकरमापक व सहाय्यक म्हणुन 2 वर्ग 4 कर्मचारी याप्रमाणे एकुण 12 युनिट तयार करणेत आलेले असुन त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी म्हणुन उपअधीक्षक भूमि अभिलेख दर्जाचे 6 अधिकारी यांची नेमणुक करणेत आलेली आहे.

सदर प्रकल्पामध्ये सॅटेलाईट इमेजरी आणि ई टि एस / डी पी पी एस (हायब्रीड पध्दत) या पध्दतीने पुनर्मोजणीचे काम खाजगी सर्व्हेक्षक संस्थाकडुन विनामोबदला करुन घेण्यात येणार असुन त्यांचे कामाची तपासणी व प्रमाणीकरण विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत करणेत येणार आहे. सदर कामाचे तांत्रिक मार्गदर्शन व तपासणीकामी महाराष्ट्र सुदुर संवेदन केंद्र नागपुर यांची नोडल एजन्सी म्हणुन नेमणुक करणेत आलेली आहे. सदर पथदर्शी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सॅटेलाईट इमेजरी या नॅशनल रिमोट सेन्सींग सेंटर, हैद्राबाद यांचेमार्फत World View-2 या उपग्रहाद्वारे फ्रेश टास्कींग या पध्दतीने घेण्यात आलेल्या आहेत. सदरच्या उपग्रह प्रतिमा महाराष्ट्र सुदुर संवेदन केंद्र नागपुर यांचे मार्फत प्राप्त होताच खाजगी सर्व्हेक्षक संस्थाकडून इमेज प्रोसेसिंग व भूखंड नकाशा तयार करणेत येणार आहेत.